Friday 9 February 2024

राघुच्यावाडी शाळेतील विद्यार्थिनीची कविता किशोर मासिकात प्रकाशित

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ (बालभारती) मार्फत किशोर मासिक प्रकाशित केले जाते. किशोर मासिकातून उत्तम बालसाहित्य विद्यार्थ्यांना वाचायला मिळते. शालेय विद्यार्थ्यांना हे मासिक खूप आवडते. या मासिकांमधून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती ला संधी दिली जाते. राज्यातील विद्यार्थ्यांच्या कविता या मासिकात प्रकाशित होत असतात.

राघुचीवाडी शाळेत दर महिन्याला किशोर मासिकाचे  ४४ अंक येतात. सर्व विद्यार्थी आवडीने मासिक वाचतात. या मासिकातून बालसाहित्य सामान्यज्ञान, शब्दकोडी,विज्ञान-तंत्रज्ञान विषयक लेख वाचायला मिळतात.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेतील इयत्ता आठवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी अमृता करवर या विद्यार्थिनीची 'पुस्तक' ही कविता किशोर मासिकाच्या फेब्रुवारीच्या अंकात प्रकाशित झालेली आहे. किशोरमध्ये कविता प्रकाशित झाल्याबद्दल तिचे कौतुक होत आहे. अमृताने शाळेच्या ग्रंथालयातील खूप पुस्तके वाचलेली असून ती वाचलेल्या पुस्तकावर छान पुस्तक परिचय लिहिते. किशोर मासिकात अमृताची कविता प्रकाशित झाल्यामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही कविता,कथा, अनुभव लिहिण्याची प्रेरणा मिळेल.

Sunday 4 February 2024

बालआनंद मेळाव्यात मुलांनी केली धमाल मजा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेत आज बालआनंद मेळावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान यावे. त्यांनी तार्किक विचार करावा. सहकार्यवृत्ती वाढीस लागावी. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा. यासाठी बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी बालआनंद मेळाव्यात भाजी मंडई भरविली होती. भाजी मंडई मध्ये विविध पालेभाज्या विकण्यासाठी आणल्या होत्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. शाळेचे मैदान गजबजून गेले होते.  पालकांनी बालआनंद मेळाव्यातील  प्रत्येक स्टॉलला भेट दिली खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बालआनंद मेळाव्यात आपल्या पाल्याचे कौतुक करण्यासाठी  पालक, शालेय व्यवस्थापन समितीतीचे सदस्य, माता पालक संघाचे सदस्य, शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

Wednesday 31 January 2024

राघुच्यावाडीच्या मुलांनी पाठवली दिल्लीला पत्रे

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त पत्रलेखन उपक्रम

राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्ती जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” दि. १४ जानेवारी २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. या पंधरवड्यामध्ये मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा संवर्धन व जतन व्हावे यासाठी राज्यभर विविध उपक्रम राबविले जातात.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त पत्रलेखन हा उपक्रम राबविण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अध्यक्ष, साहित्य अकादमी नवी दिल्ली यांना पत्रे लिहिण्यात आली. शाळेतील पाचवी ते आठवीतील ५० विद्यार्थ्यांनी पत्रलेखन केले. तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी पत्रे लिहिली.

विद्यार्थ्यांना पत्र लेखन कसे करावे हे समजले. पत्राचा प्रवास कसा होतो. पत्रावर पिन कोड कशासाठी टाकला जातो. याबद्दल माहिती मिळाली. पत्रलेखनाचा मुलांनी आनंद घेतला.

Friday 19 January 2024

कथाकथन रंगले पैठणमध्ये

काल बालकुमार साहित्य संमेलन पैठण येथे उत्साहात संपन्न झाले.कथाकथन सत्रात 'पोपटाने शोधले उत्तर' ही कथा सादर केली. कथाकथन करण्याचा हा पहिलाच अनुभव होता. कथा मुलांना खूप आवडली. मुलांनी खूप छान प्रतिसाद दिला. माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांनीही खूप छान कथा सादर केल्या.

साहित्य संमेलनानातील सर्व सत्रे खूप छान संपन्न झाली. संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. सुरेश सावंत यांचे अध्यक्षीय भाषण प्रेरणादायी झाले.

शाळेला मिळाली पुस्तके

युनायटेड वे ऑफ बेंगलुरु या सामाजिक संस्थेच्यावतीने व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेस वर्गवाचनालयासाठी पुस्तके भेट देण्यात आली. युनायटेड वे ऑफ बेंगलुरु संस्थेचे प्रतिनिधी श्री. सत्यपाल कांबळे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे पुस्तके सुपूर्द केली. पुस्तकासोबतच भिंतीवर लावावयाचे पुस्तक पॉकेट दिलेले आहे. या पॉकेटमध्ये पुस्तके ठेवली जाणार आहेत. त्यामुळे मुलांना त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा पुस्तके सहज उपलब्ध होणार आहेत.

 मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी. वाचन संस्कृती रुजावी. विविध विषयाच्या अध्यनिष्पत्ती विकसित व्हाव्यात. निपुण भारत कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आकलनासह वाचन करता यावे यासाठी या पुस्तकांचा निश्चितच उपयोग होणार आहे. 

शाळेत ग्रंथालयावर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येतात. पुस्तकांच्या माध्यमातून सहभागी वाचन, प्रकट वाचन, अभिवाचन घेण्यात येते. शाळेतील मुले पुस्तक वाचून त्यावर चर्चा करतात. पुस्तकाचा परिचय लिहितात. मुले आवडीने पुस्तके वाचतात.