Sunday 28 June 2015

Innovations

नमस्कार शिक्षक मित्रांनो,
आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी शेअर करतोय. software क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी Microsoft मागील दहा वर्षांपासून जगभरातील शिक्षकांसाठी स्पर्धा आयोजित करत असते. या स्पर्धेत शिक्षक technology चा वापर विद्यार्थ्यांसाठी कसा inovative रित्या करतात यावर आधारित ही स्पर्धा असते. सदर स्पर्धेसाठी आपण राबविलेला प्रकल्प online सदर करावयाचा असतो. सदर स्पर्धेत जगभरातील लाखो शिक्षक भाग घेतात. देश पातळीवर या स्पर्धेतून ५ ते १० शिक्षकांची निवड होते. या शिक्षकांना आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. यात येण्याजाण्याचा, राहण्याचा, सर्व खर्च microsoft तर्फे केला जातो.
यावर्षी साठी ची Microsoft Innovative Educator Expert 2016 ही स्पर्धा लवकरच खुली होत आहे. आपणा सर्वांना विनंती कि खाली दिलेल्या लिंक वर जाऊन याबत आणखी माहिती मिळवावी.
यानिमित्ताने जगभरातील शिक्षकांपुढे आपले काम ठेवण्याची सुवर्णसंधी आपल्या पुढे आली आहे. या स्पर्धेसाठी २०० देशामधून प्रतिनिधी येत असतात. आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी अशा स्पर्धा खूप मार्गदर्शक ठरत असतात.
यात भाग घेण्यासाठी आपण राबविलेला प्रोजेक्ट, त्याचे विद्यार्थ्या मधील बदल, याबद्दल माहिती अपलोड करावी लागते. त्यासाठी youtube वर तुमच्या कामाचा Video अपलोड करा. ppt मध्ये सदर सादरीकरण तुमच्या जवळ असू द्या. तुमच्या प्रकल्पाचे फोटो , बातम्या, आणखी सपोर्टिंग मटेरीअल सगळे तयार ठेवा. जुलै २०१५ मध्ये या स्पर्धेसाठी नोंदणी खुली होईल तेव्हा जरुर नोंदणी करा.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा.
माहिती :                     aka.ms/mie

नोंदणी फोर्म  :              aka.ms/mienomination

काय काय करायचे आहे याबद्दल माहिती : aka.ms/mieapply

काही अडचण आल्यास मला मेसेज करू शकता

****अनिल सोनुने *****
+91 9960650807
baljagat@gmail.com
सहशिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमखेडा खुर्द, तालुका जाफ्राबाद जिल्हा जालना
*Innovative Teachers' Leadership Award 2010
*Microsoft Global Forum Participant 2010, Cape Town, South Africa
*Microsoft Innovative Educator 2012
*Microsoft Global Forum Participant 2012, Prague, Czech Republic.
*Microsoft Innovative Educator Expert, 2015
*Awardee,Teacher Make A Differance , 2011 , PIL Fondation, India
*Star Teacher of Year, 2011, Microsoft India
*Best Website Award by Maharashtra Government for Baljagat.com
*CHIP-EBAY Dream Workstation Contest Winner, PAN India
*Responsible Netism's Young Achiever Award 2013

पायाभूत चाचणी

सर्वांना नमस्कार.

आपण जुलैअखेरीस राज्यभर पायाभूत चाचणी घेणार आहोत. मुलांना काय येते, कोठे मदतीची गरज आहे ते शोधण्यासाठी या चाचण्या आहेत. शिक्षकांनी आपापल्या वर्गात त्या घ्यायच्या आहेत.  या चाचणीचा बाऊ होणार नाही, वातावरण आश्वासक असेल, प्रात्यक्षिक-लेखी प्रश्न सोडवताना मुलांना मजा येईल, आणि एखादी न येणारी गोष्ट चाचणी देता-देता मूल सहज शिकेल अशी अपेक्षा आहे.

मुलांची गणिताची समज, कौशल्ये, विचारक्षमता तपासण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न यात आहेत. मुलांना कदाचित या प्रकारच्या प्रश्नांचे अनुभव याआधी मिळाले नसतील. त्यामुळे त्या प्रकारच्या प्रश्नांचा चाचणीपूर्वी जरूर सराव करून घ्यावा. म्हणजे मुलांना त्या गोष्टी चाचणीत करता येतील. या चाचण्या अजिबात गोपनीय नाहीत. चाचणीतील विशिष्ट प्रश्नांची उत्तरे पाठ करून घेऊ नयेत, इतकेच.

संख्यांची समज तपासताना केवळ संख्येचे वाचन लेखन तपासून पुरत नाही. ती संख्या म्हणजे नेमके किती, ते शतक-दशक-एकक प्रतीके वापरून दाखवता आले पाहिजे. तुमच्या शाळेत नेहमी जी प्रतीके वापरली जात असतील, उदा. काड्यांचे गठ्ठे-सुटे, मणी-माळा, दहाच्या व एकच्या नोटा, दांडे-सुटे, ती जास्त संख्येने जमवून ठेवा. जी प्रतीके तुम्हाला सोयीची वाटतील ती वापरा. एक, दहा, शंभर, हजारच्या खोट्या नोटा जमवा अथवा कार्डांवर लिहून मुलांच्या मदतीने तयार करा. प्रतीके वापरून संख्या तयार करणे, जमिनीवर अथवा पाट्यांवर आखलेल्या घरांमध्ये ती मांडणे व त्यानुसार संख्या अंकात लिहिणे याचा पुन्हा सराव घ्या.

या चाचणीत पुढील प्रकारचे प्रात्यक्षिक, मनात विचार करून उत्तर लिहिण्याचे किंवा लेखी प्रश्न असतील.
- ऐकलेली संख्या प्रतीके वापरून दाखवणे, अंकातील संख्या वाचून प्रतीके देणे, प्रतीके पाहून संख्येचे नाव सांगणे.
- आयतातील चौकटी मोजून गुणाकार लिहिणे.
- मोजपट्टीच्या सहाय्याने लांबी मोजणे, टेलरिंग टेपच्या सहाय्याने लांबी, परिमिती मोजणे.
- कोनमापकाच्या सहाय्याने कोन मोजणे व दिलेल्या मापाचा कोन काढणे.
- कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढणे.
- रंगवलेला भाग अंश छेद रूपात व दशांशात लिहिणे, सांगितलेला अपूर्णांक रंगवणे.

यासारख्या गोष्टींचा चाचणीपूर्वी सराव घ्या.

लेखी चाचणीतील प्रश्नही थोडे निराळ्या प्रकारचे असू शकतील. इयत्ता दुसरी व तिसरीच्या मुलांसाठी एक एक प्रश्न वाचत तो प्रश्न समजावून सांगा व मग सोडवायला सांगा. उत्तराचा क्ल्यू न देता प्रश्न समजावा. अगदी आठवीपर्यंतच्या मुलांना गरज असेल तेथे प्रश्न वाचून दाखवा. उत्तरामध्ये मांडणी, रीत, शुद्धलेखन यातले काहीही तपासायचे नाही. फक्त गणिताची समज तपासायची आहे. त्यामुळे उत्तर आले किंवा नाही आले इतकेच पहायचे आहे.

मुलांना वरील प्रकारचे अनुभव देऊन चाचणीपूर्वी जरूर सराव घ्या. पण इतके लक्षात ठेवा की चांगला रिझल्ट दाखवण्यासाठी आपण ही चाचणी घेत नाही. आपण कोठे आहोत ते पाहून पुढील काम आखण्यासाठी घेत आहोत. चाचण्या अंतिम झाल्या की तुमच्याशी त्या येथे शेअर करेनच. रिझल्ट चांगला यावा यासाठी त्यातीलच प्रश्नांची उत्तरे पाठ करून घेऊ नका. चाचणीतील प्रश्न पहा, संख्या बदलून, प्रश्न बदलून त्या प्रकारचे प्रश्न सोडवून घ्या. मुलांची समज वाढू द्या.

नंदकुमार
प्रधान सचिव,
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
महाराष्ट्र राज्य

Saturday 27 June 2015

अध्ययन अनुभव

अध्ययन अनुभव

आज तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सजीव व निर्जीव या परिसर अभ्यासातील संकल्पना सांगत  होतो....चर्चा करत होतो...त्याचं ऐकून घेत होतो.
सजीव व निर्जीव या बद्दल पाठ्यपुस्तकात दगड व चिमणी यांची तुलना केली आहे.हे दोन्हीही मुलांच्या परिचयाचेच की......
त्यामुळे मुलं भरभरून बोलत होती.
एका मुलांन एक दगड आणला होता.
मुलं दगडाबद्दल बोलत होती.
तेवढ्यात मला चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू आला.वर्गातच चिमण्या इकडून तिकडे फिरत होत्या.
तसं मुलांना सजिवांची लक्षणे समजू लागली होती.सजीवा बद्दल माहीती सांगत होती.
वैष्णवी या मुलीनं तर खूपच सृजनशील मत मांडले होते.
" सर झाड सजीव असत आणि त्याच्या  लाकडाची खुर्ची निर्जीव असते की नाही."
मुलं किती विचार करतात.....
अगदी या क्षितीजा पलिकडे

आम्हाला भेटलेल्या चिऊताईचंही  आभार हा अध्ययन प्रसंग जिवंत केला.

Friday 26 June 2015

शैक्षणिक व्हीडीओ निर्मिती

श्री नंदकुमार साहेब यांचे शैक्षणिक विडियो निर्मिती बाबत पत्र...

महाराष्ट्रात विविध माध्यमाच्या 1.04 लाख प्राथमिक शाळा असून त्यामध्ये 7.24लाख शिक्षक कार्यरत आहेत.
 प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणा साठी विविध अभियानाच्या माध्यमातून काम करण्यात  येत आहे. तरीही विविध 
पातळीवरुन होत असलेल्या सर्वेक्षणामध्ये 
राज्यातील मुलांची संपादणूक पातळी  कमी असल्याचे  दिसून येते, यावरून मुलांच्याशिकण्यामध्ये
 अडचणी आहेत तसेच शिक्षकांनाही शिकविण्या मध्ये अडचणी आहेत  हे  स्पष्ट होते . सध्याच्या 
माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिकतंत्रज्ञानाचा वापर करुन शिकणे व शिकविणे  यातील  अडचणी दूर करता येणे शक्य आहे . 
शिक्षकांना शैक्षणिक दृष्ट्या समृध्द  करणे , तसेच  मुलांच्या  गुणवत्तावाढी साठी  काम  करणे याला गतिमान करण्याची गरज आहे . 
यासाठी प्रामुख्याने भाषा , गणित , विज्ञान या 
विषयामधील संबोध स्पष्ट करण्यासाठी व अध्ययन स्तर उंचावण्यासाठी शैक्षणिक 
तंत्रज्ञानांतर्गत विविध प्रकारचे शैक्षणिक 
व्हीडीओ व तत्सम ई साहित्याची निर्मिती करता येईल. 
अध्ययन – अध्यापनात जे संबोध अवघड  वाटत असतील कसे शिकवावेयाबाबत मार्गदर्शन व्हावे असे वाटत असेल  अश्या  संबोधाबद्दल जास्तीत जास्तशिक्षकानी , शिक्षण विभागातील संबधित
अधिकायानी , शिक्षण प्रेमीनी आपला प्रतिसाद याठिकाणी 
दि. 05 जुलै 2015 पर्यंत नोंदवावा म्हणजे गरजाभिमुख ईसाहित्य 
विकसनाच्या प्रक्रियेला गती देता येईल  व  महाराष्ट्र  राज्य प्राथमिक शिक्षणाच्या  गुणवत्तेच्या संदर्भात अधिक
वरची पातळी गाठू शकेल .

आपला

नंदकुमार (भा.प्र.से.)

प्रधान सचिव , 
महाराष्ट्र शासन

व्हीडीओ निर्मिती संकेतस्थळावर स्वागत -

http://www.videonirmiti.in/

Friday 19 June 2015

ज्ञानरचनावाद

🌈 निरीक्षण
आज मला बहुवर्ग  अध्यापन कराव लागलं.
   1 ली व 3 री साठी. . . . . . मुलं स्वयंअध्ययन करत होती.
एक पहिलीची मुलगी पाठीमागील भिंतीवरच्या फळ्यावर खडूने काहीतरी लिहीत होती.तसा तिचा शाळेचा तिसराच दिवस....दोन दिवस झाले शांत शांत दिसत होती.
आज स्वत:हून स्वयंप्रेरणेने लिहताना पाहून मलाही आनंद झाला.
मी जरा जवळ जाऊन पाहू लागलो.
तिचं माझ्याकडं लक्ष नव्हतच.उलटी ABCD लिहत होती.लिहण्यात मग्न होती.मला काही समजेना . ......
वाटलं घरी काही तरी शिकली असेन
मी तिचं निरिक्षण करतच होतो.ती भिंतीवरील लिहलेली इंग्रजी अल्फाबेट्स लिहीत होती.

खरं तर ती व्यक्त होत होती.मी तिचे लिहताना फोटो घेतले.मग इतर मुलंही गोळा झाली.
तिच्या व्यक्त होण्याचं कौतुक केल्याने ती खूप आनंदी झाली होती.
ही तीन दिवस अबोला धरणारी आता वर्गात सगळीकडे आत्मविश्वासाने फिरू लागली.माझ्याशी गप्पा मारू लागली.

व्यक्त होऊ देणं किती महत्त्वाचे असते मित्रानों. .......

Thursday 18 June 2015

शिक्षण संवाद

आमच्या भूम तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी आपल्या शाळा भेटीतला समृद्ध अनुभव परवा शेअर केला होता.

तृप्ति अंधारे या प्रयोगशील, संवेदनशील, सृजनशील गटशिक्षणाधिकारी आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक प्रयोग यशस्वीपणे राबवलेले आहेत. स्माईली,दप्तराविना शाळा,शिष्यवृत्ती परीक्षा, सामान्य ज्ञान स्पर्धा, अप्रगत विद्यार्थी विहीन शाळा,तंत्रस्नेही शाळा असे अनेक उपक्रम तालुक्यात सुरू आहेत.
या उपक्रमाला समाजातील विविध घटकांनी सहकार्य केलेले आहे.

एका शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा यांनी शाळेला केलेले सहकार्य किती कौतुकास्पद आहे हे तृप्ति मॅडमच्या शब्दात व्यक्त केलेले वर्णन. ........

आज शाळाभेटी अनेक चांगल्या शाळा- शिक्षक आणि मुलं पहायला मिळाल्या..
👉🏻जिपप्राशा अंतरगाव या शाळेच्या  शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सुनिता सुहास पाटील शाळेच्या बाबतीत खूप चांगलं योगदान देतात.
👉🏻चौथी पर्यंतची शाळा आहे.. शाळेत संगणक आहे पण शिकवायला नव्हतं कोणी तर यांनी स्वत: संगणक शिकला आणि त्या आता मुलांना दररोज संगणक शिकवतात
👉🏻 शाळेबद्दल प्रचंड सकारात्मक आहेत. घरी जशी कामं करतात अग्गदी तशीचं काम त्या शाळेत देखील करतात.शिक्षकांना लागेल तिथे मदतीला तयार
👉🏻 गावोगावी असे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तयार व्हायला पाहिजेत.. पाच सप्टेंबर च्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात मी यांचा विशेष सत्कार करायचा ठरविला आहे. इतर लोक प्रेरणा घेतील.

Monday 15 June 2015

प्रेरणादायी शैक्षणिक बातमी

प्रेत जळणार्‍या स्मशानभूमीत राहून अभ्यास करणे म्हणजे भयंकरच की.......
   पण
अशा कठीण परिस्थितीवर मात करून उज्ज्वल यश मिळवणारे असे गुणवंत विद्यार्थी खरोखरच
प्रेरणेचा स्त्रोत बनतात.
अशा विद्यार्थ्यांना गरज आहे मदतीची.......

समाजानं अधिक संवेदनशील होऊन अशा मुलांना मदत करायलाच हवी.

ही बातमी दैनिक लोकसत्ता मधील आहे.
दि.15 जून 2015

प्रेरणादायी शैक्षणिक बातमी

प्रयोगशील शिक्षकांना उपक्रमासाठी प्रोत्साहन

Saturday 13 June 2015

प्रेरणादायी शैक्षणिक बातमी

आर्थिक परिस्थितीवर मात करून नैपुण्य मिळवणारे गुणवंत विद्यार्थी. .......
दैनिक दिव्य मराठी

प्रयोगशील शिक्षकांनो लिहते व्हा....

SIRF Maharashtra Solapur यांच्या माध्यमातून प्रयोगशील शिक्षकांना व्यक्त होण्यासाठी IIM Ahamadabad ने संधी उपलब्ध करून दिली आहे. हे व्यासपीठ सर्वांना खुले आहे.
चला तर मग लागा कामाला. ......

Hello.
https://goo.gl/pkWPQs
The first question from the Discussion Forum, IIM-Ahmedabad & SIRF is here. To answer it, open the link mentioned above.
By filling up this form, you'll get a letter  worth 15 points from IIM-A & SIRF.
If you have not registered yet, then register now by simply clicking the link. This question is based on Teaching-Study Innovations. Thank you!
                     By SIRF MAHARASHTRA

Thursday 11 June 2015

Tech Savvy Teacher's

तंत्रस्नेही शिक्षकांसाठी महत्वपूर्ण पोस्ट

मा. नंदकुमार साहेब ( प्रधान शिक्षण सचिव ) यांच्या प्रेरणे तुन संपूर्ण महाराष्ट्रात Tech savvy  चळवळ सुरु झाली आहे .  अध्ययन - अध्यापन प्रक्रिया ही अधिक परिणामकारक होण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर अनेक शिक्षक करीत आहेत . मा . साहेबानी दिलेल्या सुचनेनुसार सर्व tech savvy शिक्षकांना एकत्र आणन्याच्या दृष्टीने www.techsavvyteachers.in या नावाचे संकेतस्थळ सुरु करण्यात आलेले आहे . तरी आपण सदर संकेतस्थळावर नोंद करुन आपण आपला  शिक्षणात तंत्रज्ञान या संबंधाने खारिचा वाटा उचलावा ही , विनंती .

करीता सोबत एक मार्गदर्शक व्हिडिओ आहे , त्याचेही अवलोकन व्हावे ..

( Android App - www.techsavvyteachers.in/tech.apk  )

तंत्रस्नेही शिक्षक सदस्य
www.techsavvyteachers.in

                          By  सुनिल आलुरकर
Maharashtra Tech Savvy Teacher's
                               

एक्सेल गुरू - महेश हारके

मा.श्री.महेश हारके सहाय्यक शिक्षक
कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येनगुर जि. उस्मानाबाद.
तंत्रस्नेही चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तीमत्व.सैदव महाराष्ट्रातील शिक्षकांना यांचे कडून नेहमीच काहीतरी मिळत आलेले आहे.आणि मिळतच राहणार.
यांच्या कार्याचा थोडक्यात द्रुष्टिक्षेप आपणासमोर सादर करित आहोत.
श्री.महेश हारके सरांनी शिक्षकांना आपल्या दैनंदिन कार्यात अडचणी येऊ नयेत.याकरिता महत्त्वाची साॅप्टवेअर्स बनविलेली आहेत.
ही साॅप्टवेअर्स हाताळण्याकरिता अत्यंत सोपी असुन साधारणपणे काॅम्प्युटरची माहिती असणाऱ्यास सुद्धा त्यास हाताळणे अवघड नाहीत.
उल्लेखनीय गोष्ट अशी कि ही त्यांची साॅप्टवेअर्स महाराष्ट्रातील ब-याच संकेतस्थळावर त्यांनी मोफत पुरविलेली आहेत.महाराष्ट्रातील शिक्षक या नात्याने मी त्यांचा सदैव ऋणी राहील.त्यांची महत्त्वाची काही साॅप्टवेअर्स मी येथे आपणासोबत या पोष्टद्वारे शेअर्स करित आहो.निश्चितच आपणास त्याचा फायदा होईल.यात शंकाच नाही.
१) इयत्ता १ ते ८ च्या वर्णनात्मक नोंदी
२) Smart School (कागद विना शाळा)
३) Exam.Manager (परीक्षेसाठी )
४) शालेय पोषण आहार (संपूर्ण अहवाल बनवा दहा मिनिटात)
५) इयत्ता १ ते ८ चे निकालपत्रक
६) इयत्ता ९ वीसाठी निकालपत्रक
७) पीनकोड शोघणे.
८) वयाचे कॅल्क्यूलेटर (पाच सेकंदात आजचे वय काढा)
९) इनकम टॅक्स ( आपला इन्कमटॅक्स टॅक्स कसा काढावा संपूर्ण फाॅर्मेटमध्ये)
१०) शाळेसाठी कुटुंब पंजिका
११) लेसन प्लान
१२) माझी सम्रुद्ध शाळा
१३) शाळा गुणवत्ता सनियंत्रण
१४) जि.पी.एफ.स्लिप.
वरिल साॅप्टवेअर्सचा वापर केल्यास आपला निश्चितच ताण कमी होऊन वेळ सुद्धा वाचणार आहे.हि सर्वच साॅप्टवेअर्स खालील संकेतस्थळावरुन आपणास मोफत डाऊनलोड करता येतील.आपण उपयोग घेऊन इतरांना उपयोगात येईल त्याकरिता या पोस्टला शेअर्स करावे ही विनंती.
www.mahazpteacher.blogspot.in

       ■Maharashtra Savvy Teacher's  

                                            वरून साभार
                

Wednesday 10 June 2015

सांस्कृतिक कार्यक्रम

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे काॅलेज आॅफ एज्युकेशन उस्मानाबाद  येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या  बी.एड च्या दुसर्‍या सत्राच्या  समारोप प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. छात्रअध्यापकांनी छान
कार्यक्रम सादर केला. अगदी अप्रतिम !!!!!!!
  पडवळ सरांचे बहारदार सुत्रसंचलन. . . . . .
   तेलंग सरांचे पसायदानवरील छोटसं प्रवचन
  जावळे मॅडम, इंगळे मॅडम, जाधवर सर , हलसे सर यांची परीक्षा हाॅल ही लघुनाटीका हे सादरीकरण खुपच छान झालं.
सर्व प्राध्यापक उपस्थित होते. काही जणांनी अभंग तर काहींनी कविता  सादर केल्या.

शिक्षकाचा व्यक्तिमत्व विकसनासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात.
मी प्रथमच माझा विद्यार्थी या माझ्या पुस्तकातील चारोळी वाचन केले. प्रतिसाद खुप छान मिळाला.

पर्यावरणीय प्रेरणादायी बातमी

दैनिक दिव्य मराठी या वर्तमानपत्रातील दि.10 जून 2015 रोजची बातमी.
मित्रानों या पावसाळ्यात प्रत्यकानं वृक्षारोपण कराच.
नक्की करा.
आठवणीनं बरं का?
  मी सुद्धा आमच्या शेतात पडीक जमिनीवर 50 तरी झाडं लावणार आहे. शाळेतील मुलांना पण झाडं लावायला सांगणार आहे.
आमच्या शाळेत आम्ही छान बागबगीचा केला आहे.
मुलांच्या घरासमोरही झाडं लावलेली आहेत.
  छान आलेली आहेत . मुलं म्हणतात.....
        'सर झाडं बघायला चला.'
       त्यांच्या घरासमोरही झाडं बघून खूप आनंद होतो.

Tuesday 9 June 2015

सहशालेय उपक्रम

आज बी.एड .च्या सत्रात सहशालेय उपक्रम या विषयावर चर्चा झाली. सहशालेय उपक्रम राबविताना येणाऱ्या अडचणी कोणत्या?
सहशालेय उपक्रमाचे प्रकार याबाबत चर्चा झाली.
        ज्ञानरचनावादी अध्ययन अनुभवाची रचना करताना उपक्रमाचे आयोजन करावे लागते. यातुन मुळ स्वानुभवातुन शिकत असते.बरेच उपक्रम समाजिक संवेदना जागृत करणारे असतात. सामाजिक उत्तरदायीत्वाची जाणीवही होते.
        मुलं शिकत शिकत जगत असतं . . . .
          जगत जगत शिकत असतं
याचाही अनुभव अशा उपक्रमातून येत असतो.

Monday 8 June 2015

ज्ञानी मी होणार

गेल्या अनेक वर्षापासून मी हा उपक्रम आमच्या शाळेत राबवत आहे.

☆मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड  निर्माण व्हावी.
☆त्यांना अवांतर पुस्तक वाचनाची गोडी लागावी.
☆वर्तमानपत्र नियमित वाचावे.
यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मुलांना फळ्यावर दररोज दोन सामान्यज्ञानाचे प्रश्न दिले जातात.मधल्या सुट्टीत प्रश्न मुले लिहून घेतात. परिपाठातही या प्रश्नाचे वाचन होते.

दर महिन्याला 20 गुणांची चाचणी घेण्यात येते.
मुलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी बक्षिसे दिली जातात.

येत्या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.


लेख

आभा भागवत या कलावंत मैत्रिणीने लिहिलेला हा लेख ATF MAHARASHTRAवरुन इथे देत आहे. अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा लेख आहे. जरुर वाचा. मत नोंदवा.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा राजमार्ग - आभा भागवत

एक वर्षाच्या आसपासचं बाळ जेव्हा हातातली एखादी वस्तू एखाद्या पृष्ठभागावर घासून बघतं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ओरखड्यांची गंमत वाटून पुन्हा पुन्हा तीच कृती करून बघतं, तेव्हा त्यातून निर्मितीचा निखळ आनंद ते घेत असतं. आपल्याला कळतं की आता चित्र निर्मितीला बाळाची सुरुवात झाली. रेघोट्या स्वरूपाच्या या चित्रांसाठी शक्य ते सर्व पृष्ठभाग बाळ वापरून बघतं आणि नेमकं कशावर कशानी चित्र उठतं हे अचूक शोधून काढतं. आणि पुन्हा पुन्हा चित्र निर्मितीचा आनंद घेतं.

हे चित्रप्रवासातलं पाहिलं पाऊल मोठी माणसं कसं स्विकारतात त्यावर बाळाचे निर्मितीतला आनंद घेण्याचे क्षण अवलंबून असतात. काही पालक भिंत, जमीन खराब होते या भीतीपायी बाळाला रागावून, बारीक लक्ष ठेवून चित्र निर्मितीपासून परावृत्त करतात. तर काही ताबडतोब बाजारातून खडू आणून देतात आणि भिंतीवर कागद लावून किंवा एक कोपरा ठरवून त्याबाहेर काढू नकोस असं वारंवार बाळाला बजावतात. काहींना बाळानी काढलेल्या प्रत्येक रेघेचं, ठिपक्याचं विलक्षण कौतुक वाटतं आणि चित्र निर्मितीसाठी वाट्टेल ते करायला ते तयार होतात. भिंत, रंगीबेरंगी कागद, वह्या, जमीन, शरीर, अंघोळीचं पाणी, बाथरूम असे अनेक पृष्ठभाग आणि तेली खडू, पेन्सिली, स्केचपेन्स, ओले रंग, भाज्यांचे रंग, रांगोळीचे रंग, फूड कलर्स अशी अनेक माध्यमं हौसेहौसेनी पुरवतात. मनसोक्त वापरू देतात. मुलाला यातून अनेक प्रयोग करण्याच्या संधी मिळतात आणि ते शांत आणि आनंदी होतं. स्वतःला रमवण्यासाठी त्याला इतरांवर अवलंबून रहावं लागत नाही. आमच्या घराच्या भिंतीही अशाच मुलांच्या चित्रांनी सजलेल्या आहेत. उंची वाढतेय तसे छतावर चित्र काढण्याचे प्रयोग सुरु झालेत. मुलांना समजलेले, आवडलेले, जमलेले आकार, रचना, एखादया गोष्टीचं कार्य (function), लिपी, मुलांच्या मनातले विचार, कल्पना, भीती, आनंदाच्या भावना अशा असंख्य गोष्टींचं ते दृश्य स्वरूप आहे. फक्त मनगट वापरण्याऐवजी मोठ्या पृष्ठभागांवर खांद्यापासून संपूर्ण हात आणि शरीर वापरून चित्र काढल्यामुळे छोटया घरातून मोकळ्या रानात जाऊन जी ऊर्जा, उत्साह मिळतो तसंच घडतं. When the hand is free the mind too feels liberated.

मुलाला वाढताना सातत्यानी अशा संधी मिळत राहिल्या तर मूल खूपच सृजनशील आणि समाधानी बनतं. ज्या मुलांच्या या संधी काढून घेतल्या जातात त्यांची स्वतः प्रयोग करून शिकण्याची भूक भागत नाही आणि ती मुलं सतत आनंद देणाऱ्या कृतींच्या शोधात असतात. त्यांचा तो झगडाच बनतो. ज्येष्ठ कलासमिक्षक हर्बर्ट रीड म्हणतात "A child's Art is its passport to freedom". सुरुवातीच्या रेघोट्या हे मुलाच्या अंतर्मनातील छोट्या छोट्या गोष्टींचं दृश्य स्वरूप असतं. पालकांनी आपल्याला नेहमीच संपूर्ण स्वीकारावं अशी मुलाची नैसर्गिक गरज असते. मुलाच्या रेघोट्यांची अवहेलना करून, त्यांना कमी लेखून मुलाची अभिव्यक्ती चिरडायची आपली सवय काढून टाकली पाहिजे. मुलांची चित्रकला आहे तशी स्विकारणारे पालक आणि शिक्षकही हळू हळू भारतात निर्माण होत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. छोट्या मुलांना पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर करून प्रत्येकच कृतीचा आनंद घेता येतो. पण मोठ्या माणसांची पंचेद्रिय वापरण्याची आणि त्यांची मुलाच्या वाढीतील भूमिका ओळखण्याची संवेदनक्षमता कमी अथवा नाहीशी झालेली असते. विशेषतः सुशिक्षित वर्गात हा प्रश्न गंभीर वळण घेत आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेनी लादलेली विषयांचे कप्पे करण्याची सवय बाजूला ठेवून छोट्या मुलाच्या कृतींकडे आपण परिपूर्ण प्रक्रिया म्हणून बघण्याची गरज आहे. चित्रकला हा या प्रक्रियेचा अविभाज्यच नव्हे तर अतिशय महत्वाचा हिस्सा आहे.

चार - सहा महिन्याची बाळं पाळणाघरांत पाठवली जातात आणि तिथेच त्यांना चुकीच्या पद्धतीनी चित्रकलेची ओळख होते. Apple च्या outline मध्ये red कलर भरायला देतात अवघ्या ९ महिन्याचा बाळाला. आणि त्यातून A for Apple असं मूल शिकेल अशी इच्छा असते. होतं असं की छापलेल्या चित्राकडे दुर्लक्ष्य करून मुलाच्या अजून पुरेशा विकसित न झालेल्या बोटांच्या पकडीनी चित्रावर रेघोट्या मारून मूल त्याहून छान काहीतरी करायला पळतं. घाईनी चुकीची माध्यमं आणि चुकीच्या अपेक्षा समोर ठेवून मुलांच्या विकासात आपण अडथळेच निर्माण करतो. त्यापेक्षा मूल आपणहून स्वतःच्या गरजेनी जेव्हा चित्रकलेचा शोध लावेल तेव्हा त्यातली मजा त्याला पूर्णपणे चाखता येईल यावर मोठ्यांनी विश्वास ठेवायला हवा. हा छोटासा शोध मोठ्यांना जरी नविन नसेल तरी मुलानी पहिल्यांदाच अनुभवलेला असल्यामुळे त्याचं मूल्य खूप मोठं आहे.

दीड-दोन वर्षाच्या चिमुकल्यांना अल्फाबेट्स समजावीत म्हणून वहीत छापलेल्या A to Z आकारांवरून टीचर मुलाचं बोट हातात पकडून त्या आकारावर ओल्या रंगांनी ठिपके काढत फिरवतात. सुमारे अर्धा तास सगळ्या मुलांची ही activity होते. आणि मग त्याचं मूल्यमापन करून मुलाची कशी आमच्या शाळेत येऊन प्रगती झाली याची पालकांना खात्री करून देतात तेव्हा त्यातलं शिक्षणमूल्य, सौंदर्यंमूल्य, प्रक्रियामूल्य, बोधमूल्य अशा असंख्य मुलभूत मूल्यांपासून ते मूल वंचित रहातं याची जाणीवही अनेक शाळांना नसते. अशा सुमार कृतींपेक्षा मूल नुसतं खेळलं तरी त्याचा शिकण्याचा प्रवास सुरु राहील. चित्रकला हा विषय तर लहान मुलांना शिकवायची गरजच काय? मूल स्वतःहून शिकत असतं याचा आपल्याला विसरच पडत चाललाय की काय?

४-५ वर्षाची मुलं व्जेव्हा गोष्टी रचून सांगायला लागतात तेव्हा त्यांची गोष्ट सांगता सांगताच अनेक वेळा बदलते. त्यांचे कल्पनांचे, भाषेचे प्रयोग चालू असतात. हीच गोष्ट जर लिहायला सांगितली तर त्यातली लवचिकता नाहीशी होते आणि १०० कल्पनांऐवजी त्यातील केवळ एकच व्यक्त होते. ही प्रयोग करण्याची मोकळीक शिक्षणामुळे हिरावून घेतली जाते का काय? छापील आकारात रंग भरायला दिल्यावर सफरचंद याहून वेगळं सुद्धा काढता येऊ शकेल ही शक्यता नाकारून टाकणं हा मला तर गुन्हाच वाटतो. जसं त्रिकोणी डोंगर, त्यातून डोकावणारा सूर्य, त्यातून वाहणारी नदी, एखादं ठराविक घर, झाड, मराठी चार अंकासारखे पक्षी हे चित्र कित्येकजण डोळे झाकून काढू शकतात. हा चित्रकला रसग्रहणातला मोठा अडथळा आहे. सगळ्यांनी ठरवून ही साचेबंद चित्र बघणं, काढणं, शिकवणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपली चित्रकलेतील अभिरुची तयार होणार नाही. चित्रकलेचं सौंदर्यमूल्य जाणून घेण्यासाठी प्रचंड पायाभरणीची अजूनही गरज आहे. आपल्या सौंदर्यसंवेदना जोपर्यंत आपण जागृत करत नाही आणि असुंदर गोष्टींच्या स्विकाराला विरोध करत नाही तोपर्यंत चित्रकलेत क्रांती होऊ शकणार नाही. शिक्षणात, व्यवहारात, समाजात, कौटुंबिक चौकटीत चित्रकलेला दुय्यम दर्जा प्राप्त होण्यामागे उपेक्षित सौंदर्यमूल्यच कारणीभूत आहे असं वाटतं.

मनसोक्त चित्र काढणं हा मुलांचा अधिकार आहे. अधिकार प्राप्त करण्यासाठी मुलं काहीच करू शकणार नाहीत इतकी ती निर्बल आहेत. हा हक्क मोठया माणसांनी आपणहून मुलांना दिला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही सुरुवातीची पावलं असतील.
---------------

कसा वाटतोय जरूर कळवा

                                   ~  ATF वरून साभार