Friday 31 July 2015

किल्ला बनवूया

मुलांना काहीतरी काम करायला फार आवडते.
आज मधल्या सुट्टीत बागेजवळ काहीतरी तयार करत होती.

कोण किल्ला बनवत होते तर कोण इंग्रजी अक्षरे बनवत होते.स्वतःच्या कौशल्यांचा वापर करून सृजनशीलतेचा अविष्कार मुलं दाखवीत होती.
प्रत्येक जण तन्मयतेने काम करत होता.एकमेकांना मदतीचा हात दिला जात होता.स्वतःची कल्पना दुसर्‍याला सांगितली जात होती.

अशा प्रकारच्या श्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास होतो.

Thursday 30 July 2015

राज्य अभ्यासक्रम समिती

राज्य अभ्यासक्रम,पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तक निर्मिती समीतीवर मराठी विषयासाठी माझी निवड झालेली आहे.

यासंदर्भात दि 3/7/2015 ते 5/7/2015 या कालावधीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ठाणे
येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

Tuesday 28 July 2015

तारे जमीन पे

दैनिक लोकसत्ता च्या शनिवारच्या 25 जुलैच्या  लोकरंग पुरवणीत अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांबद्दल लेख वाचला.या मुलांच्या शिक्षणावर कोणीही गंभीरपणे विचार करताना दिसत नाही. त्या मुलांची पडताळणी करण्यासाठी जिल्ह्यात कुठेही केंद्र नाहीत. ही बाब वाचण्यात आल्यावर या प्रश्नाकडे गांभीर्याने बघायला पाहिजे असे वाटते. अशा मुलांच्या तपासणीसाठी राज्यात केवळ चारच केंद्र असून कसे चालेल?

      एल.डी.म्हणजेच लर्निंग डिसेबिलिटी यालाच अध्ययन अक्षमता म्हणतात. सर्वसाधारण मुलांच्या प्रमाणेच अशा मुलांना शिकण्यात अडथळे येतात. परंतु ही समस्या प्रयत्नाने दूर करता येऊ शकते. अशा मुलांची संख्याच अजून तरी निश्चित झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या शिकण्यातील अडथळेही दूर झालेले नाहीत. अशी मुले भाषा व गणित विषयातील क्षमता कौशल्यांच्या विकासात मागे राहतात. काही मुलांची गणितातील गती चांगली असते.तर भाषा विषयातील गती मंद असते. काही मुलांचे याउलट असते.
डिसलेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया असेही या विकारांना म्हणतात.

गाेरगरिबांच्या मुलांना एल.डी.चाचणी करणेही शक्य नाही. कारण अशा केद्रांची सोय जवळपास नाही व त्यासाठी शुल्क आकारले जाते. अशा मुलांची आकडेवारी राज्य सरकारने येत्या 15  ऑगस्ट पर्यत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याचे वाचण्यात आले.

अप्रगत विद्यार्थी विहीन महाराष्ट्र करण्यासाठी अशा मुलांना शोधून काढूच त्याच्यासाठी विशेष कृतीकार्यक्रम आखण्याची गरज आहे. कारण लेखन वाचन कार्यक्रमातून मुलांना आवश्यक क्षमतांचा विकास झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे अशा मुलांच्या आकलनशक्तीच्या सुधारण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत.स्मरणशक्ती चांगली असूनही आकलनाच्या पातळीवर ह्या मुलांचा गोंधळ उडतोय.शिवाय भाषा व गणित या विषयाच्या बाबतीत भिन्न स्थिती आढळते.

   त्यामुळे शाळाबाह्य मुलांना ज्याप्रकारे शोधून काढले जात आहे. सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.ही मुलेही शालेय शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत.
त्याच प्रकारे एल डी मुलांना शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच अप्रगत विद्यार्थी विहीन महाराष्ट्र होईल असे वाटते.

Thursday 23 July 2015

भाषा शिक्षण

नमस्कार मित्रमैत्रिनींनो,
मुलांच्या भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी आपण उपक्रम, प्रात्यक्षिक, भाषिक खेळ, शब्दकोडी, विनोद घेत असतो.

पाठ्यपुस्तकांच्या बाहेर जावून आपण इतर पुरक
साहित्य वापरू शकतो.
वर्तमान पत्रे,मासीके यातही खूप काही शिकायला मिळते.शिवाय अवांतर वाचनाची सवयही लागेल.

अवांतर वाचन ज्या मुलांचे चांगले असेल त्या मुलांचे पुर्वज्ञान चांगले असते.त्यामुळे अशा मुलांना आशयाचे आकलन सहज होते.याचा अनुभव मला इयत्ता तिसरी ला परीसर अभ्यास विषय शिकवताना आला.

भाषिक कौशल्यांचा विकास झाला की भाषासमृद्धी तर होतेच पण इतर विषयासाठी पण खूप फायदा होतो.

चला तर वाचन संस्कृती वाढवू.

Sunday 19 July 2015

शिक्षकाचं पालकत्व

मुलांच्या घरची परिस्थिती बेताचीच असेल तर शिकताना त्याला खूप संकटे येतात.मुलांच्या शिक्षणात खंड पडू शकतो.
अशा वेळी शिक्षकांना त्यांचं पालकत्व स्विकारावे लागते.संवेदनशील शिक्षकांनाही असे पालकत्व स्विकारल्याची खूप उदाहरणे आहेत.
त्या बद्दलची ही प्रेरणादायी बातमी.

आता समाजातील शिक्षणप्रेमी,संवेदनशील लोकांनीही पुढं याव व अशा मुलांना मदत करावी.

काय करू शकतो आपण?
* वह्या,पुस्तके, गणवेश असे साहित्य देऊ शकतो.
* चप्पल,बूट अशा वस्तू देता येतील.
* शाळेतील बालवाचनायला पुस्तके देता येतील.
* मुलांसाठी विज्ञान खेळणी,शैक्षणिक साहित्य   देता येईल.

चला मग कोण कोण तयार आहे.लिहा काॅमेंटमध्ये
शाळा,विद्यार्थी मी सुचवतो.

त्यांना आपण थेट मदत करू शकता.

आनंददायी शिक्षण

शिक्षेमुळे बुद्धि वाढत नाही; भय मात्र वाढते.
भयाने बालके लिहून, वाचून, धडे करून येतीलही,पण शेवटी तर ती शिकलेले विसरूनच जातील.
             - गिजुभाई बधेका

मुलांना शिक्षा नकोच.आनंददायी व बालस्नेही वातावरणात मुले चांगली शिकतात.
त्यासाठी रंजक खेळ शाळेत घ्यायला हवेत.
कृतीतून शिकू द्यावे.
प्रात्यक्षिक, उपक्रम, प्रकल्प भरपूर असावेत.

आठवड्यातील एक दिवस दप्तराविना शाळा घ्यावी.

शिक्षण म्हणजे काय?

प्रेरणादायी बातमी

संशोधनाचा ध्यास घेतलेला बालशास्त्रज्ञ

Saturday 18 July 2015

सिकाॅमचा अहवाल

नमस्कार मित्रमैत्रिनींनो,
महत्वाच्या लिंकवर जाऊन प्राथमिक शिक्षणावर सखोल भाष्य करणारा अहवाल नक्की वाचा.
* शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक कामे
* पर्यवेक्षीय यंत्रणा
*शिक्षकाचे मूल्यमापन /सी.आर

   अजून भरपूर काही.......

Saturday 11 July 2015

अध्ययन अनुभव

मायेची पाखर.
वेच्याचा वेचक वेधक प्रसंग.
..................................................................
आज इयत्ता चाैथीच्या मुलांना मायेची पाखर पाठ शिकवत हाेताे. माझ्याकडे जाेड वर्ग असल्याने इयत्ता दुसरीची मुलेही ऐकत हाेती. मी पाठ शिकवतांना एवढा गुंग झालाे की कर्मवीर भाऊरावांच्या त्या कार्याने माझे डाेळे पाणावले. गाेरगरिबांच्या व पाेरकी झालेल्या मुलांना त्यांनी आई वडिलांसारखे प्रेम दिले. हे वाचून मन भरून आले.शाळेतील मुलांवर आणि माझ्या स्वत :च्या मुलांवर मी किती प्रेम करताे ? तेवढा वेळ मी  देताे का ? कर्मवीरांसारखी माणसे दुसऱ्यांच्या मुलांवर एवढी माया, प्रेम देवू शकतात  यांच्याकडे किती माेठा  दृष्टिकोण, व  विचार हाेता. हयाच विचारात मी थाेडा वेळ राहिलाे. काही वेळाने
   माझ्या डाेळयांत पाणी आले हे पाहून दुसरीतला मुलगा म्हणाला. "सर, सर मी एक गाेष्ट सांगू हां सर, सांगू मी बाेललाे सांग बरं काय सांगताेस ते लवकर.. सर
माझ्या घरी गाय आहे ती ना व्यालेली. तिकडे चरायला साेडलेले ना व्हाेळात तिकडेच. मग ना ते वासरू पाण्यात भिजलेले दाेन दिवस वासरू व्हाेळातील थाेडयाशा पाण्यातच हाेते. दुसऱ्या दिवशी माझ्या बाबांना समजले आपली गाय कुठेतरी व्यायली आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी चरायला साेडले आणि तिच्या पाठीपाठी गेलाे तर ना ती त्या पिल्लाला ना जिभेने चाटत हाेती. आम्ही जवळ गेलाे की अंगावर धावायची मग ना माझ्या बाबांनी वासरूला उचलले आणि घरी आणले ते लुकलुक डाेळे ना काढून दाखवायचे हां, मग ना आम्ही गायीला दांडयाला बांधले दुध काढले आणि त्याला बाटलीने पाजले पण ना संध्याकाळी वासरू मेले मला रडू आले. सगळयांना खुप ना सर वाईट वाटले. मी रडतच हाेताे मग ना सर माझ्या बाबांनी ते वासरू व्हाेळाकडे नेले. मी पण साेबत हाेताे. तर ना, आमच्या मागून गाय दांडा ताेडून हंबरत धावत आली. आणि आम्ही जिथे वासरू ठेवलेले तिथे येवून पुन्हा ना चाटायला लागली. मग पुन्हा गायीला आजाेबा न मी घरी घेवून गेलाे, तर तिला चारा दिला ना सर तरी पण खात नव्हती तिच्या डाेळयात ना सर मी पाणी येतांना पाहिले. मग ना सर मला रडू आले.... सर आमची गाय बघायला याल ना सर तुम्ही.... लाल कलरची आहे. हां सर याल..?.??.. सांगा ना ? सर........ मी म्हणालो, येईन. कधी सर.?..... शाळा सुटल्यावर.. चला आम्ही निघालाे मायेची करूणेची, ममतेची, दयेची, प्रेमाची अशा गाैमातेला प्रणाम करण्यासाठी जिने माझ्या विद्यार्ध्यांला एवढा माेठा संस्कार दिला..

गौमाता सृष्टि की देन है. इसे बचाईये उसका पालनपाेषण करे. अपना जीवन समृद्ध करे.
                                
                                       वेच्या गावीत
                                           रायगड

Friday 10 July 2015

भाषिक कौशल्यांचा विकास

*स्वअभिव्यक्ती क्षमताक्षेत्राच्या विकासासाठी उपक्रम

भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी नविन पाठ्यपुस्तकात भाषिक खेळ,शब्दकोडी, विनोद, उपक्रम, प्रात्यक्षिक दिलेली आहेत.
खरोखरच ही नविन पाठ्यपुस्तके मुलांना भाषासमृद्धीकडे घेऊन जाणारी आहेत.
या पाठ्यपुस्तकांच्या बाहेर जावून ही आपण काही मुलांच्या भाषा समृद्धिसाठी आपण काही उपक्रम घेऊ शकतो.
असाच एक उपक्रम मी आमच्या शाळेत सुरू केलाय.हा उपक्रम दर शुक्रवारी घेतला जातो.

📌 मुलांना परिचित,त्यांच्या भावविश्वातील एक शब्द देऊन त्यावर मुक्तलेखन करण्यास सांगितले जाते.
उदा. खिडकी, अंगण, टेबल, वही

📌आज मुलांना खिडकी हा शब्द दिला होता.इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी च्या मुलांनी दहा मिनीटात यावर लिहले.

📌 मुले खिडकी या शब्दावर छान लिहती झाली होती.
एका दुसरीच्या मुलाने लिहलं होतं खिडकीला कोणीही डकलतं,आदळतं
त्यामुळे तिला दु:ख होते.
📌 काही मुलांनी खिडकीचे चौकोनी, आयताकृती असे आकार सांगितले होते.म्हणजेच यातुन गणित,परिसर अभ्यास या विषयाचाही सहसंबंध साधला गेला होता.

मुले आनंददायी वातावरणात लिहीत होती.त्याच्यातील सृजनशीलता फुलत होती.
                       

Friday 3 July 2015

चला त्यांना शोधूया .......शिक्षणाच्या प्रवाहात आणूया

नमस्कार सर्वांना
उद्या 4 जुलै रोजी शाळाबाह्य मुलांचे राज्यात एकदाच सर्वेक्षण होणार आहे. आपण सर्वजण त्यासाठी सज्ज झालो आहोत.
आता मात्र एकही मुल शालेय शिक्षणापासून वंचित नक्कीच राहणार नाही. त्या मुलांना शोधून काढूच.
शाळाबाह्य असलेली मुले शालेय शिक्षणाच्या प्रवाहात आणूया.
सर्वांना शुभेच्छा. .........

काही संग्रहीत छायाचित्रे

Thursday 2 July 2015

शिका पोरा शिक

माझा आर्यन आता पहिलीच्या वर्गात गेलाय.शालेय शिक्षणाची सुरूवात झालीय.खुप उत्साहाने तो दररोज शाळेत जातोय.पहिलीच्या वर्गात जातानाच तो छान वाचून करतोय.रचनावादाप्रमाणे तो वाचन करायला शिकला.क,का,कि बाराखडी न शिकताच तो वाचू लागला.किशोर मासीकातील कविता गाऊन दाखवतो.कधी कधी वर्तमान पत्रही चाळतो.छोटी    छोटी गोष्टीची पुस्तके वाचतो.अरविंद गुप्ताच्या " सोपी विज्ञान खेळणी "या पुस्तकातील कृती पाहून विज्ञान खेळणी बनविण्याचा प्रयत्न करतो.
    घरातील भिंतीवर चित्रे काढून लावतो.खुप प्रश्न विचारतो.जिज्ञासूवृत्ती,सृजनशीलता,चिकित्सा करणे हे सारं त्याच्यात आहे.बाप म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो.
पण काही सांगावसं वाटतं लेकराला.....
खुप खुप शिक पोरा.IAS,IPS सारखे उच्च ध्येय ठेव पण त्या अगोदर एक चांगला माणूस बन.
शिक्षण फक्त शाळेतच मिळेल हा भ्रम मनातून काढून टाक. जगण्यातील अनुभव पण खूप काही शिकवतात हे ध्यानात ठेव.भावनांचे समायोजन, विचारांचे नियमन करायला शिक.दुर्बलांना आधार द्यायला विसरू नकोस.एक चांगला माणूस बन.