Thursday 15 March 2018

भाषा शिक्षण समजून घेताना....

भाषा शिक्षण समजून घेताना.....
--------------------------------------------------

महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे,युनिसेफ व क्वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने क्वेस्टचा  मराठी ऑनलाईन कोर्स सुरू आहे. या कोर्स चे पाचवे संपर्क सत्र प्रत्यक्ष क्वेस्टमध्ये  सोनाळे ता.वाडा जि.पालघर येथे दि.12 व 13 मार्च रोजी संपन्न झाले.मा.निलेश निमकर सरांचे अनमोल मार्गदर्शन  लाभले.आमच्या मार्गदर्शक  मा.सुजाता लोहकरे मॅडम  विभाग प्रमुख मराठी तथा उपसंचालक विद्याप्राधिकरण पुणे ह्या आमच्यासोबत होत्या.

-----------------------
फिल्ड व्हिझीट
-----------------------
📌 अंगणवाडी भेट:-

पहिल्या दिवशी आमचे चार गट करून परिसरातील अंगणवाड्या पाहण्यासाठी गेलो होतो.पूर्व प्राथमिक स्तरावरील उत्तम शिक्षण मुलांना क्वेस्टच्या मदतीने दिले जात आहे.तिथल्याच अंगणवाडी ताई कशा पद्धतीने दिवसभरात विविध भाषिक उपक्रम राबवतात हे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. वारली भाषा असतानाही बोलीकडून प्रमाणभाषेकडे मुले येत असल्याचे दिसून आले.अंगणवाडीचे दररोज घ्यावयाच्या उपक्रमाचे दैनिक नियोजन होते.याप्रमाणे
मुक्तखेळ,बडबडगीत,परिपाठाचे उपक्रम, सहभागी वाचन,अभिनयगीत,भाषानुभव,गणिती अनुभव, विज्ञानुभव,कलानुभव,मोठा खेळ, गोष्ट.
याप्रमाणे नियोजन होते.हे सर्व उपक्रम किती छान पद्धतीने राबवले जात असून मुलांना समृद्ध अनुभव मिळत होते.याबद्दल कौतुक वाटले.

📌 बालभवन भेट:-
दुपारच्या सत्रात एका आश्रमशाळेतील बालभवनाला भेट दिली.क्वेस्टच्या मदतीने बालभवन चालवले जाते.भाषाशिक्षण,गणिताचे शिक्षण,या विषयांचा इतर विषयांशी समन्वय हे तेथिल अध्ययन समृद्ध वातावरणातून दिसून आले. बालभवनातील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात गटागटात  बहूस्तर अध्ययन अनुभव दिले जात होते. इथले माझे पुस्तक, स्व-अभिव्यक्तीत फलक,माझे लेखन,गोष्टीचे स्वलिपीत लेखन,वर्तमानपत्रातील कात्रणांचा संग्रह असे खुप छान छान उपक्रम समजून घेतले.

क्वेस्ट मध्ये आल्यावर मा.निलेश सरांशी चर्चा केली. अतिशय दुर्गम भागातील वेगवेगळ्या ठिकाणी अंगणवाड्याचे कसे उत्तम काम चालू आहे. याचे अनुभव ऐकले.आदिवासी भागातील रचनात्मक काम पाहून सर्वजण भारावून गेले होते.गाड्यातून फिरताना सागाचं जंगल,विरळ दहा-पाच कौलारू घरे किंवा लिंपलेल्या झोपड्या दिसत होत्या.

----------------------
*दुसरा दिवस*
-----------------------

#गोष्ट रंग#

क्वेस्ट चा गोष्ट रंग हा खुप छान उपक्रम. याबद्दल या अगोदर ऐकलं होतं. आज प्रत्यक्ष गोष्ट रंग अनुभवायला मिळाले. संतोष गायकवाड व अश्विनी पांडे यांनी एक गोष्ट सादर करून दाखविली.लहान मुलांसाठी क्वेस्ट ची टिम नाट्यीकरणातून गोष्टीचे सादरीकरण करते. याला मुलांचा खुपच छान प्रतिसाद मिळतो.याबद्दलचे अनुभव सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या सौभाग्यवती कुलकर्णी मॅडम यांनी शेअर केले.

📌 पुस्तक गाडी:-

पुस्तक गाडी हा क्वेस्टचा खुप छान उपक्रम. वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी छान छान पुस्तके पुस्तक गाडी घेऊन जाते. यामुळे वाचनाची गोडी लागते.

📌 मा.निलेश सरांनी *वाचन* यावर खुप छान मार्गदर्शन केले.देशविदेशातील संशोधनाच्या माध्यमातून हा विषय खुप छान समजून सांगीतला.

मराठी विषयाच्या विषय सहायकांना समृद्ध अनुभव मिळाले.निसर्गाच्या सान्निध्यात कसे दोन गेले काही समजले नाही.स्वतःला समृद्ध करणारा एक अविस्मरणीय अनुभव.

समाधान शिकेतोड
विषय सहायक
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद.